मोदींच्या बायोपिकनंतर नमो टिव्हीवरही निवडणूक आयोगाची बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणुकांच्या दरम्यान प्रदर्शित होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपट पीएम नरेंद्र मोदींच्या प्रदर्शनास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. त्यातच नमो टिव्हीवरही निवडणूक काळात बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय जाहीर केला आहे.

बायोपिकवर बंदी घालण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश नमो टिव्हीसाठीही लागू होतो. त्यामुळे निवडणुकीदरम्यान या चॅनलचे प्रसारण रोखण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आयोगाकडे एनटीआर लक्ष्मी, पीएम नरेंद्र मोदी आणि उदयामा सिंहम यांसह इतर काही चित्रपटांबाबत तक्रार आली होती. यामध्ये एक उमेदवाराला किंवा एका राजकीय पक्षाला निवडून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. हे चित्रपट जर प्रदर्शित झाले तर ते निवडणूकीवर परिणाम करु शकतात, त्यामुळे ते आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.