आझम खान यांना पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा दणका ; ४८ तासांची प्रचारबंदी

रामपूर : वृत्तसंस्था – वादग्रस्त विधान करणारे सपाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्यावर निवडणूक आयोगाने ४८ तासांची प्रचार बंदी घातली आहे. आझम खान हे रामपूर लोकसभा मतदारसंघातील सपा-बसपा आघाडीचे उमेदवार आहेत. वादग्रस्त विधान केल्यामुळे आझम खान पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.

निवडणूक आयोगावर पक्षपाताचे आरोप आणि धार्मिक तेढ वाढवणारे वक्तव्य केल्याबद्दल प्रचार बंदी लादण्यात आली आहे. बुधवारी सकाळपासून ही बंदी अंमलात येणार आहे.

“पूर्ण भारतात रामपूरच असे दुर्दैवी शहर आहे की तेथील एका समाजाचे मतदार मतदान करू नये यासाठी त्यांच्यावर मोठा दबाव आणला गेला. जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या मतदारांना धमकावले”, असा आरोप आझम खान यांनी केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेत त्यांच्यावर ही बंदी घातली आहे. या बंदीमुळे ते राज्यातील कोठेही सभा किंवा प्रचार रॅलीत भाषण करू शकणार नाहीत. तसेच त्यांना कोणत्याही प्रसारमाध्यमांना मुलाखत देता येणार नाही.

यापूर्वी, आझम खान यांच्या विरोधात जयाप्रदा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like