दिल्ली विधानसभा ! EC नं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांच्यावर 72 तर खासदार प्रवेश वर्मांवर लावला 96 तासांचा ‘बॅन’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूकीदरम्यान प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याचा कथित प्रकार घडला. यामुळे असे वक्तव्य करणाऱ्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. आयोगाने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर 72 तास तर भाजप खासदार प्रवेश सिंह वर्मा यांच्यावर 96 तासाची बंदी घातली आहे.

यापूर्वी निवडणूक आयोगाने बुधवारी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि प्रवेश सिंह वर्मा यांचे नाव भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी अनुराग ठाकूर आणि बुधवारी वर्मा यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती आणि गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत उत्तर मागवले होते.

अनुराग ठाकूर आणि प्रवेश सिंह वर्मा यांनी केलेल्या वक्तव्यावर आयोगाने आदेश दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. काँग्रेसने दावा केला की निवडणूकीत हार निश्चित असल्याने भाजप नेते अशा भाषेचा वापर करत आहेत.

आचारसंहितेचे उल्लंघन –
वर्मा यांना जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये आयोगाने सांगितले की दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. नोटीसमध्ये आयोगाने म्हणले की वर्मा यांनी एका मुलाखतीत सीएएच्या विरोधात शाहीन बागमध्ये झालेल्या आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य केले होते, जे सोशल मीडियावर देखील पसरले होते.

याशिवाय विकासपुरी विधानसभा क्षेत्रात देखील वर्मा यांच्याद्वारे सभेत देखील शाहीन बागच्या आंदोलकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते, हे आचारसंहितेचे उल्लंघन मानले गेले. यावर वर्मा यांच्याकडे निवडणूक आयोगाकडून उत्तर मागवण्यात आले होते.

आयोगाने 30 जानेवारीला दुपारी 12 वाजेपर्यंत उत्तर मागितले होते. आयोगाने नोटीसमध्ये म्हणले की लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कलम 125 अंतर्गत येणाऱ्या धर्म, जाती, संप्रदाय आणि भाषेच्या आधारे सामाजिक सौहार्द्राला ठेस पोहचवणारे वक्तव्य केले होते, ते आचारसंहितेचे उल्लंघन आहे. दिल्लीच्या सीईओ कार्यालयाद्वारे आयोगाला मंगळवारी पाठवलेल्या अहवालानुसार ठाकूर आणि वर्मा यांच्याद्वारे दिल्लीमध्ये प्रचारादरम्यान विवादास्पद वक्तव्य करण्यात आल्याची पृष्टी झाली होती.