आयकर विभागाकडून १ कोटी ४८ लाख रुपये जप्त

कार्यर्त्यांची पोलिसांसोबत झटापट, पोलिसांचा गोळीबार

चेन्नई : वृत्तसंस्था – एएमएमके कार्य़ालयावर आयकर विभागाने टाकेलेल्या छाप्यात १ कोटी ४८ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या कारवाईत रोख रक्कमेसह चार जणांना अटक केली आहे. तर १५५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएमएमके हा टीटीव्ही दिनाकरन यांचा पक्ष आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी याआधी डीएमके नेत्या कनिमोझी यांच्या कार्यालयावर छापा टाकला होता. मात्र या ठिकाणी पथकाला काहीही आढळले नाही.

मंगळवारी सकाळी सुरू करण्यात आलेली कारवाई रात्री उशीरापर्यंत सुरू होती. या कारवाईत पथकाला ९४ पाकिटांमध्ये ठेवलेली १ कोटी ४८ लाख रुपयाची रोकड सापडली. या पाकिटावर वॉर्ड क्रमांक लिहिला होता. हे सर्व विभाग अंडीपट्टी विधानसभा क्षेत्रात येतात. प्रत्येक मतदाराला ३०० रुपये याप्रमाणे पाकिटामध्ये रक्कम ठेवण्यात आली होती. मतदारांना पैसे वाटण्यासाठी कार्यालयात दोन कोटी रुपेय आणल्याचे कार्यकर्त्याने पथकाला सांगितले. पथकाने या कार्यालयातून रोख रक्कमेसह पोस्टल बॅलेट पेपरही जप्त केले. या पेपरवर एएमएमके उमेदवाराच्या नावासमोर शिक्का मारण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी हे पेपर जप्त करून सिल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकण्यासाठी पथक आले असता पक्ष कार्यकर्त्यांनी पथकाला विरोध केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तसेच पथकाशी झटापट करणाऱ्या चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच १५५ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएमएमके हा टीटीव्ही दिनाकरन यांचा पक्ष आहे. पक्ष पेरियाकुलम लोकसभा मतदारसंघासह अंडीपट्टी विधानसभेची जागाही लढवत आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे मतदान गुरूवारी होणार आहे.