‘त्या’ वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींना क्लीन चिट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नरेंद्र मोदी यांच्या भारताकडे असलेले अणुबॉम्ब दिवाळीमध्ये वापरण्यासाठी ठेवलेले नाहीत या वक्तव्यावर आक्षेप घेत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. दरम्यान निवडणूक आयोगाने हे वक्तव्य आदर्श आचासंहितेचे उल्लंघन नसल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २१ एप्रिलच्या आयोजित सभेत बोलतांना भारताने पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरणे आता सोडून दिले आहे. नाहीतर पूर्वी दररोज आमच्याकडे न्युक्लिअर बटन आहे, या गोष्टीचा पाकिस्तानकडून पुनरुच्चार होत होता. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. तर मग आमच्याकडे असलेला अणुबॉम्ब आम्ही दिवाळीसाठी ठेवला आहे का ? असे वक्तव्य केले होते. दरम्यान काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार प्रचारादरम्यान भारतीय सैन्याचा उल्लेख करत आहेत, सैनिकांच्या नावाने मत मागत आहेत. आता तर मोदींनी अणुबॉम्बचादेखील उल्लेख केला आहे. सशस्त्र दलाबाबत विधाने करुन मोदी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. असे म्हणत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, मोदींचे हे वक्तव्य आदर्श आचासंहितेचे उल्लंघन नसल्याचे सांगत निवडणूक आयोगाने मोदींना क्लीन चिट दिली आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या विविध विधानांवरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एकूण ११ तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यापैकी 3 तक्रारींचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. तीनही वेळा निवडणूक आयोगाने मोदींना क्लीन चिट दिली आहे.