‘राजकीय नेते कर्तव्य पार पाडण्यात कमी पडले’, हायकोर्टाने फटकारल्यानंतर EC ची याचीका

चेन्नई : वृत्तसंस्था – देशात पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या असून 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. पाच राज्यांमध्ये प्रचार सभांमध्ये कोरोनाच्या नियमांचे जाहिरपणे उल्लंघन होत असतानाही राजकीय पक्षांना न रोखल्याने मद्रास उच्च न्यायालयाने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा, अशा शब्दांत न्यायालयाने आयोगावर ताशेरे ओढले. न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर निवडणूक आयोगाने आपल्या प्रतिमेला तडा गेल्याचे सांगत न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

निवडणूक आयोगाने मद्रास उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले की, प्रसारमाध्यांनी सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी केलेल्या तोंडी निरीक्षणे आणि टिप्पण्या नोंदवू नयेत आणि केवळ निकालात नोंदवलेल्या निरीक्षणाचा अहवाल द्यावा अशी मागणी केली आहे.

माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टमुळे निवडणुका पार पडण्याची घटनात्मक जबाबदारी असलेली स्वतंत्र घटनात्मक संस्था म्हणून निवडणूक आयोगाची प्रतिमा डागाळली आहे. असेही निवडणूक आयोगाने याचिकेत म्हटले आहे. निवडणूक आयोगाने यावेळी राजकीय नते आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले असल्याचा उल्लेख केला आहे. याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

विधानसभेच्या विविध टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे. मतमोजणी दरम्यान कोरोना नियमांचे पालनाचे निर्देश देण्याच्या मागणीसाठी तामिळनाडूचे परिवहनमंत्री आणि अण्णाद्रमुकचे उमेदवार एम.आर. विजयभास्कर यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी आणि न्या. एस. राममूर्ती यांच्या खंडपीठाने सोमवारी सुनावणी घेतली. कोरोना नियमांचे पालन करुन मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जात असल्याचे निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने निवडणूक आयोगाची कानउघडणी केली.

मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाची कानउघडणी केल्यानंतर आयोगाकडून निकालाच्या दिवशी आणि विजयानंतर विजयी मिरवणुकांवर बंदी घातली. यामुळे राजकीय पक्षांच्या विजयी उमेदवारांना कोणत्याही प्रकरारे विजयी जल्लोष किंवा मिरवणुक काढता येणार नाही.