अभिजित बिचकुले यांना निवडणुक आयोगाची नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वरळी विधानसभा या बहुचर्चित मतदारसंघातून निवडणुक लढविणाऱ्या अभिजित बिचकुले याच्यासह तिघा उमेदवारांना निवडणुक आयोगाने नोटीस बजावली आहे.
निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणुक आयोगाला दैनंदिन प्रचाराचा हिशोब द्यावा लागतो. प्रचारादरम्यान तीनदा हा खर्च उमेदवारांना सादर करावा लागतो. मात्र, या उमेदवारांनी हा खर्च सादर न केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे.

वरळी येथील अपक्ष उमेदवार अभिजित बिचकुले, बहुजन समाज पार्टीचे विश्राम तिडा पाडम आणि अपक्ष उमेदवार महेश पोपट खांडेकर यांना ही नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती वरळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली. वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून युवा नेते आदित्य ठाकरे निवडणुक लढवत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ चर्चेचा झाल्याने अभिजित बिचकुले यांनी येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवत आहेत.

उमेदवारांच्या दैनिक खर्चात दिवसभरात होणारा खर्च, वह्यांची नोंद आदी खर्च सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. नोटीस बजावूनही खर्च दाखविला नाही तर आयोगाकडून कठोर कारवाई होऊ शकते. वारंवार नोटीस पाठवून उत्तर न आल्यास आयोगाकडून पुढील ६ वर्षांसाठी उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येते.

अभिजित बिचकुले वरळी आणि सातारा या दोन ठिकाणाहून निवडणुक लढवत आहे. पण त्यांच्यामागे किती कार्यकर्ते आहे, हा प्रश्नच आहे. त्यामुळे ते नेमका कोठे प्रचार करतात, याची कोणाला कल्पना नाही.
धनादेश परत गेल्याने दाखल खटल्यात वारंवार उपस्थित न राहिल्याने सातारा न्यायालयाने त्यांच्यावर अटक वॉरंट काढले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना बिग बॉसच्या शोमध्ये जाऊन अटक केली होती. त्यावरुन ते चर्चेचा विषय ठरले होते.

visit : Policenama.com