
PM मोदी यांच्याविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याबाबत उद्यनिधी स्टॅलिन यांना Election Commission ची नोटीस
पोलीसनामा ऑनलाइन – द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या छळामुळे आणि दबावामुळेच भाजपा नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू झाल्याचे उद्यनिधी स्टॅलिन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या आरोपाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत स्टॅलिन यांना नोटीस पाठवली. निवडणूक आयोगाने स्टॅलिन यांना बुधवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या आधी उत्तर देण्यास सांगितले आहे. स्टॅलिन उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यास कारवाई केली जाईल असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाने नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भाजपाने आमच्याकडे 2 एप्रिलला तक्रार केली असून उदयनिधी स्टॅलिन यांनी 31 मार्चला एका रॅलीत संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला छळ आणि दबावामुळे सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू झाल्याचे वक्तव्य केल्याचे सांगितले आहे. स्टॅलिन यांनी आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. दरम्यान उदयनिधी स्टॅलिन यांनी यावेळी पंतप्रधान पक्षातील वैंकय्या नायडूंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत असल्याचेही म्हटले आहे. तुम्ही सर्वांनाच बाजूला केले आहे. मिस्टर मोदी मी ई पलानीस्वामी नाही जो तुम्हाला घाबरेल आणि तुमच्यासमोर झुकेल. मी उदयनिधी स्टॅलिन असल्याचेही ते यावेळी म्हणाले.