पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ ‘त्या’ प्रकरणी निवडणूक आयोगाची नोटीस

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन – मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार पार्थ पवार यांना पेड न्यूजबाबत खुलासा करण्याबाबत नोटीस पाठवली आहे. तसेच रायगड लोकसभा मतदारसंघात विना परवानगी सोशल मीडियावर जाहिरात पोस्ट करुन आचारसंहिता भंग केल्याबाबत राष्ट्रवादीचे उमदेवार सुनील तटकरे यांना नोटीस पाठवली आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीस पाठवली आहे.

मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ‘पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पनवेल विधानसभा क्षेत्र दौरा’ ही बातमी व ‘पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ गैव दौऱ्यांना सुरुवात’ ही एकसारखी बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या दोन्ही बातम्या पेड न्यूजमध्ये मोडत आहेत. या बातमीचा खर्च उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट का करु नये असा खुलासा उमेदवारास विचारुन कार्यवाहीचा अहवाल माध्यम सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीला लवकरात लवकर पाठवावा. याबाबत पार्थ पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
खेड काँग्रेस तालुकाध्यक्ष गौसभाई खतीब यांनी फेसबुक या सोशल साईटवरुन राष्ट्रवादी कांग्रेस, काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना मतदान करण्याचे आवाहन मुस्लिम समाजाला केले आहे. एखाद्या विशिष्ट समाजाला, जातीला उद्देशून आवाहन करणे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे. त्यामुळे दापोली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खातीब यांना नोटीस पाठवली आहे.