महाराष्ट्रातील निवडणूकीतील खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी खर्च निरीक्षकांची नियुक्ती

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून सनदी अधिकारी शैलेंद्र हांडा यांची नियुक्ती केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र आणि तामिळनाडू राज्यातील लोकसभा निवडणूक काळात होणाऱ्या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी खर्च निरीक्षक म्हणून अनुक्रमे शैलेंद्र हांडा आणि मधू महाजन या निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

शैलेंद्र हांडा यांना आयकर खात्याच्या तपास विभागात कार्य करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. निवडणूक यंत्रणेद्वारे केल्या जाणाऱ्या कामावर हांडा लक्ष ठेवणार आहेत. तसेच निवडणूक प्रक्रियेला बाधा पोहोचवत मतदारांना रोख रक्कम, दारू वाटणाऱ्या व इतर प्रलोभने दाखविणाऱ्या व्यक्ती/संस्था यांच्याविरुद्ध ‘सी-व्हीजील’द्वारे आणि 1950 या मतदार हेल्पलाईनवर’ प्राप्त झालेल्या माहिती आणि तक्रारींच्या आधारे कठोर कारवाई करण्याचे अधिकार हांडा यांच्याकडे असतील.