निवडणूक आयोगाकडून उमेदवारांच्या खर्चाचे दरपत्रक निश्चित

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करण्यात येतो. या खर्चावर देखरेख ठेवण्याचे काम निवडणूक आयोगाकडून करण्यात येते. उमेदवाराने केलेल्या खर्चाचे मोजमाप करण्यासाठी आयोगाला देखील दरपत्रक तयार करावे लागते. देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उमेदवरांच्या खर्चाचे दरपत्रक निश्चित करण्यात आले. यानुसार वडापाव १५ रुपये तर मटण थाळीसाठी २५० रुपये हा दर निश्चित करण्यात आला आहे.

निवडणूकीमध्ये केलेल्या खर्चाचा हिशोब प्रत्येक उमेदवाराल द्यावा लागतो. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक लोकसभा मतदारनिहाय निवडणूक खर्चाचे दरपत्रक निश्चित करण्यात येते. या दरपत्रकाप्रमाणेच उमेदवाराला आपल्या खर्चाचा तपशील द्यावा लागेल. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे. या दरपत्रकानुसार उमेदवरांच्या खर्चाची नोंद होणार आहे.

निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या दरपत्रकानुसार, वडापाव आणि पॅटीस प्रत्येकी 15 रुपये, पोहे आणि उपमा प्रत्येकी 30 रुपये, चहा साधा 8 तर स्पेशल चहा 15 रुपये, शाकाहारी थाळी 100 रुपये, स्पेशल शाकाहारी थाळी 150 रुपये, अंडाकरी थाळी 90 रुपये, मटण, चिकन, मच्छी थाळी प्रत्येकी 250 रुपये, पाण्याची बाटली 15 रुपये, शीतपेय 15 रुपये या खाण्यांच्या पदार्थाबरोबर अन्य गोष्टींचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

निवडणुकीत दरम्यान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन, भाड्याने वापरण्यात येणाऱ्या गाड्यांचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. स्पीकर प्रतिदिनी 354 रुपये, झेंडे 35 पासून 60 रुपयांपर्यंत, टोपी 25 रुपये, बिल्ले 10 रुपये, छायाचित्राची फित वीस रुपये, अगदी मंडप, खुर्च्या हारतुऱ्यांपासून फटाक्यांपर्यंत दर निश्चित करण्यात आले आहेत. 1000 ची माळ साडेसातशे रुपयांनी खरेदी करावी लागणार आहे.

निवडणूक काळात कार्य़ालयात वापरण्यात येणाऱ्या लहानतल्या लहान वस्तू पासून ते प्रचारात वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा हिशोब उमेदवारांना द्याव लागणार आहे. निवडणुकीत उमेदवार ढोल वादन पथक, पोवाडे, पथनाट्य सादर करतात. त्यांचे मानधन देखील निवडणुक आयोगाने निश्चित केले आहे. पोवाडे सादर करणाऱ्या पथकाला दोन हजार रुपये तर पथनाट्य पथकाला चार हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे.