मोदींच्या बायोपिकनंतर वेबसिरीजची स्ट्रीमींग बंद

निवडणूक आयोगाचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आचार संहितेचे उल्लंघन मानत निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकवर बंदी घातल्यानंतर आता एरोस नाऊ वरील मोदी द जर्नी ऑफ अ कॉमन मॅन या वेबसिरीजचे ऑनलाईन स्ट्रीमिंग त्वरित बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

एरोस नाऊ ने ‘मोदी: जर्नी ऑफ कॉमन मॅन नावाची ५ भागांची वेबसिरीज तयार केली आहे. 3 एप्रिल रोजी ती प्रदर्शित झाली आहे. या वेबसिरीजचे ऑनलाईन स्ट्रीमींग एरोस नाऊच्या वेबसाईटवरून सुरु होते. यासंदर्भात कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या वेब सिरीजमधून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यातून आचार संहितेचा भंग होत आहे. त्यामुळे या वेबसिरीजवर बंदी घालावी’ अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने या वेबसिरीजचे ऑनलाईन स्ट्रीमींग बंद करण्याचे आदेश देत पुढील आदेश येईपर्यंत वेबसिरीजशी संबंधित सर्व कंटेंट हटविण्याचा आदेश दिला आहे.