”नमो” टीव्हीवरील प्रक्षेपणाला निवडणूक आयोगाची परवानगी, पण…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपला आणखी एक धक्का दिला आहे. आयोगाने प्रचार थांबल्यावर म्हणजे मतदानाच्या ४८ तास आधी नमो टीव्हीवर रेकॉर्डेड शो दाखविण्यास मनाई केली आहे. मात्र नमो टीव्हीला निवडणुकीचे थेट प्रक्षेपण दाखवण्यास परवानगी दिली आहे.

नमो टीव्हीवरील प्रसारणावर आयोगाने राज्य निवडणूक आयुक्तांना लक्ष ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. तसेच या चॅनलेचे मॉनिटरींग करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी विना परवानगी कोणताही कार्यक्रम नमो टीव्हीवर दाखविण्यास मनाई केली होती. नमो टीव्ही भाजप चालवत असून त्यामुळे या टीव्हीवरील सर्व रेकॉर्डेड कार्यक्रम विना परवानगी दाखविता येणार नाही, असे आयुक्तांनी म्हटले होतं. परवानगी शिवाय दाखविण्यात येणारा सर्व कंटेन्ट या चॅनलवरुन हटविण्याचे आदेशही देण्यात आले होते.
आयोगाचे निर्देश…

मतदानाच्या पूर्वी ४८ तासांत नमो टीव्हीवर मतदारांना प्रभावित करणारा कोणताही रेकॉर्डेड शो दाखविता येणार नाही. लाइव्ह किंवा रेकॉर्डेड कार्यक्रम सुद्धा अपडेट करून दाखवता येणार नाही. या संदर्भात निवडणूक आयोगाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. सर्व न्यूज आणि जाहिराती देणाऱ्या वाहिन्यांप्रमाणेच नमो टीव्हीलाही हे नियम लागू असणार आहेत. सोशल मीडियाला सुद्धा हे नियम लागू आहेत.