भाजपने सुरु केलेली ‘नमो टीव्ही’ ही विनापरवाना वाहिनी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचा २४ तास प्रचार करणारी ‘नमो टीव्ही’ ही उपग्रह वाहिनी विना परवाना असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने ‘नमो टिव्ही’ही उपग्रह वाहिनी सुरु केली असून त्यावरुन मोदी व त्यांच्या संबंधित सर्व भाषणे २४ तास प्रक्षेपित केली जात आहे. याबाबत आप आणि काँग्रेस यांनी तक्रार केल्यानंतर निवडणुक आयोगाने माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागविले. त्यात त्यांनी ‘नमो टिव्ही’ ही वाहिनी विना परवाना वाहिनी असून त्यावरुन प्रक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाचा खर्च भाजप करीत आहे, असे उत्तर माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिले आहे. मात्र, त्यावर माहिती व प्रसारण मंत्रालयाने काय कारवाई केली, हे सांगण्यात आलेले नाही.

एरवी एखादी वाहिनी सुरु झाल्यानंतर ती प्रत्यक्ष दिसण्यासाठी विशेषत: डीटीएच असलेल्या ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी अनेक महिने सुद्धा लागतात. संबंधित वाहिनी आणि या डीटीएच कंपन्या यांच्यात आर्थिक व्यवहार पूर्ण होत नाही, तोपर्यंत या कंपन्या आपल्या डीशवर ती वाहिनी दाखवत नाही. मात्र, ‘नमो टिव्ही’चे प्रक्षेपण सुरु झाल्यानंतर तातडीने सर्व डीटीएच कंपन्यांनी ती दाखविणे सुरु केले. भाजपच्या दबावामुळेच ती कोणताही परवाना नसताना दाखविली जात असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात सुमारे ३५० विना परवाना वाहिन्या सक्रिय झाल्याचे सांगण्यात येते.