‘दहशतवाद्यांना बिर्याणी’ या वक्तव्यावरून CM योगींना निवडणूक आयोगाची ‘नोटीस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बिर्याणीवरून केलेले वक्तव्य भोवण्याची चिन्ह आहेत. योगींच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून योगींना नोटीस बजावून त्यावर खुलासा मागितला आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभेसाठीचं मतदान दोन दिवसांवर आले असताना भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवार (दि.7) सांयकाळी पाच वाजेपर्यंत खुलासा देण्यास सांगितले आहे.

दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या स्टार प्रचारकांना दिल्लीत बोलावून घेतले होते. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनाही बोलावून घेतले होते. त्यांनी दिल्लीच्या अनेक भागामध्ये सभा आणि रोड शो करत भाजपचा प्रचार केला होता. यावेळी त्यांनी शाहीन बागमध्ये सुरु असलेल्या सीएए कायद्या विरोधातील आंदोलनावरून विरोधकांवर निशाणा साधला होता.

अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला होता. जे लोक काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं समर्थन करत आहेत, तेच लोक शाहीन बागमध्ये आझादीच्या घोषणा देत आहेत. केजरीवाल सरकार दिल्लीतील जनतेला स्वच्छ पाणी देत नाही, पण शाहीन बागमधील आंदोलकांना बिर्याणीचं वाटप करत आहेत, अशी टीका योगी यांनी केली होती.