HC कडून निवडणूक आयोगाची कानउघाडणी; म्हणाले – ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला केवळ तुम्ही जबाबदार’

मद्रास : वृत्तसंस्था – मागील वर्षापेक्षा यंदाची कोरोनाची लाट अधिक तीव्र दिसत आहे. दैनंदिन बाधितांचा आकडा अधिक वाढत आहे. अशा परिस्थितीत ४ राज्य आणि १ केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमुळे कोरोनाचा आणखीन संसर्ग वाढला आहे. यादरम्यान अनेक राजकारणी लोकांनी, पक्षांनी मोठ्या सभा घेतल्याने या कारणावरून मद्रास हाय कोर्टाने निवडणूक आयोगाला चांगलंच सुनावलं आहे.

मद्रास हाय कोर्टाचे न्या. संजीव बॅनर्जीं यांनी सुनावणी वेळी, राजकीय पक्षांना प्रचार सभा घेण्यासाठी परवानगी कशी दिली. असा प्रश्न केला आहे. तसेच, भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात. तुमच्या अधिकाऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल व्हायला हवा, असे देखील कोर्टाने संताप व्यक्त केलाय. कोर्टाच्या आदेशानंतरही निवडणूक प्रचारसभांमध्ये फेसमास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा बोजवारा दिसून आला, याबाबत न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, पुढे न्यायालय म्हणाले, निवडणूक प्रचारसभा सुरू असताना तुम्ही कोणत्या जगात होतात, असा थेट प्रश्न न्या. बॅनर्जीं यांनी विचारला आहे.

पुढे न्या. बॅनर्जीं म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीवेळी काय उपाययोजना करणार आहात, असा सवाल करत, मतमोजणीदरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीची रूपरेषा सादर करा. नाहीतर २ मे रोजी होणारी मतमोजणी रोखू, असा निहित इशारा सुद्धा दिला आहे. तसेच, ते पुढे म्हणाले, देशातील जनतेच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवं आणि घटनात्मक संस्थांना याची आठवण करून द्यावी लागते ही बाब दुर्दैवी आहे. मतदान हा लोकांचा अधिकार आहे. तो त्यांना लोकशाहीनं दिला आहे. पण जनता जिवंत राहील, तेव्हाच त्यांना हा अधिकार बजावता येईल. सध्या बचाव आणि सुरक्षेलाच सर्वाधिक प्राधान्य आहे. बाकीच्या बाबी यानंतर येतात, असे देखील न्या. संजीव बॅनर्जीं यांनी म्हटलं आहे.