पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रचार बंदी येणार ?

काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात गेल्याने निवडणुक आयोगाला अखेर जाग

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून वारंवार आणि सराईतपणे केल्या जाणाऱ्या आचार संहिता भंगाविरुद्ध तक्रार करुनही निवडणुक आयोगाने कोणती ठोस कारवाई न केल्याने काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावल्यानंतर आता निवडणुक आयोगाला जाग आली आहे. त्यांनी या तक्रारीची दखल घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे निवडणुक आयोग पंतप्रधानांवर प्रचारबंदी घालणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राहुल गांधी यांच्या विरुद्धच्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर निवडणुक आयोग आज मंगळवारी सुनावणी करणार आहे. मोदी व शहा यांच्याविरुद्ध काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या तक्रारीची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेऊन त्यावर आजच सुनावणी ठेवली आहे. हे समजल्यावर निवडणुक आयोगही खडबडून जागे झाले. त्यांनीही नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारीवर आजच सुनावणी घेण्याचे ठरविले. त्याचबरोबर राहुल गांधी यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारीची दखल घेणार आहे.

अगदी निवडणुकांच्या तारखा ठरविण्यापासून निवडणुक आयोगाने भाजपला सोयीचे होईल असे निर्णय घेतल्याची तक्रारी विरोधकांकडून केल्या आहेत. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर निवडणुक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ, मेनका गांधी, मायावती आदिवर प्रचारबंदी घातली होती.

लातूर जवळील औसा येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांच्या नावाने आपले पहिले मत द्या, असे आवाहन केले होते. पुलवामा हल्ल्यातील शहीदांचे स्मरण करुन मतदान करण्याचे आवाहन त्यांनी करुन आचार संहिता भंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल आठवड्यापूर्वीच राज्य निवडणुक आयोगाने मुख्य निवडणुक आयोगाला पाठविला आहे. पण, त्यावर अजूनही आयोगाने निर्णय घेतला नाही.

तसेच २३ एप्रिल रोजी अहमदाबाद येथे मतदानाला जाताना मोदी यांनी रोड शो केला. मतदान केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी करुन घोषणाबाजी केली. त्यावर पोलिसांनी काहीही दखल घेतली नाही. निवडणुक आयोगाकडे याच्या तक्रारी आल्यानंतर त्यांनी काहीही केले नाही़. शेवटी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यावर निवडणुक आयोग जागे झाले आहे.

निवडणुक आयोगाने पंतप्रधानांवर प्रचार बंदी घातली तर निवडणुकीला वेगळे वळण लागू शकते. त्यामुळे आयोग नेमके काय करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.