निवडणूक आयोगाकडून रेल्वे, उड्डाण मंत्रालयाला कारवाईचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेच्या तिकिटावर आणि एअर इंडियाच्या बोर्डिंग पासवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आल्याने आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने रेल्वे बोर्डचे संचालक आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव यांना पत्र लिहिले आहे. याप्रकरणी योग्य कारवाई करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने रेल्वेला नोटीस बजावली होती.

मात्र, या नोटिशीला उत्तर देण्यात न आल्याने निवडणूक आयोगाने रेल्वे बोर्डाचे संचालक आणि नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सचिवांना पत्र लिहिले आहे. दोन्ही विभागांना आचारसंहितेचे पालन करण्याचा सल्ला निवडणूक आयोगाने दिला होता. मात्र, शुक्रवारी एअर इंडियाने बोर्डिंग पासवर पंतप्रधान मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या फोटोचा पुन्हा वापर केला. शुक्रवारी संध्याकाळी मदुराईहून उड्डाण केलेल्या विमानातील प्रवाशाने बोर्डिंग पासचा एक फोटो ट्विट केला. त्यावर मोदी आणि रुपाणी यांचे फोटो होते.

आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे एअर इंडियाला टीकेचा सामना करावाल लागला होता. त्यानंतर विमान कंपनीने बोर्डिंग पास रद्द करण्याचा निर्णय घेतला. तरीही मोदींचे फोटो असलेले बोर्डिंग पास वापरले जात आहेत. दुसऱ्या एका प्रकरणात भाजपाच्या निवडणूक प्रचाराचा भाग असलेल्या ‘मैं भी चौकीदार’ घोषणा असलेल्या चहाचा कप रेल्वेत आढळून आला होता. याबद्दल निवडणूक आयोगाने रेल्वेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. एका प्रवाशाने चहाचा कपाचा फोटो ट्विट केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.