लोकसभा 2019 : निवडणूक आयोगाच्या ‘या’ निर्देशाला केराची टोपली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सरकारी व खाजगी शिक्षण संस्थांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निवडणूक प्रचारासाठी वापर करून घेता येणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बैठकीत सांगितले होते. त्याचा निर्देश निवडणूक आयोगाचाही आहे. मात्र, नगर लोकसभा मतदारसंघात शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचा निवडणूक प्रचारासाठी वापर केला जात आहे. त्याकडे निवडणूक यंत्रणा डोळेझाक करीत आहे.

सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्था शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद, महानगरपालिकांचे शिक्षक यांचा वापर निवडणूक प्रचारासाठी करता येणार नाही, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. त्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी नगर लोकसभा मतदारसंघात शिक्षकांचा कोणीही प्रचारासाठी वापर करू नये, असे निर्देश दिले होते. तसे आढळल्यास संबंधित शिक्षण संस्थांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, नगरमध्ये अनेक खासगी शिक्षण संस्थांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वापर निवडणूक प्रचारासाठी केला जात आहे. तसेच प्रचाराचे नियोजन, इतर बाबतीतही त्यांचा सक्रीय सहभाग दिसून येत आहे. असे असतानाही निवडणूक यंत्रणा केवळ बघ्याच्या भूमिकेत आहे. कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे हा विषय आता चांगलाच चर्चेचा ठरला आहे.