माढ्यात नवीन ट्विस्ट : भाजपकडून विजयसिंह मोहिते पाटील यांची घोषणा होणार ?

माढा (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन – देशात पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस संपला तरी, भाजपाकडून माढ्यातील उमेदवार जाहीर करण्यात आला नाही.भाजपकडून आज माढा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र या जागेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव मागे पडलं असून, विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याच नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपात प्रवेश केलेले रणजितसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्या नावाची भाजपामध्ये या आधीच चर्चा सुरू आहे. त्यातच आता भाजपामध्ये प्रवेश न केलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

माढ्यातील नाट्यमय घडामोडी –

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढ्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. माढ्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः निवडणूक लढवणार होते. मात्र त्यांनी माघार घेतली. आणि माढ्याचा तिढा वाढला. या जागेवर विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची दावेदारी मानली जात होती. मात्र त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा त्यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. मात्र त्यांनतर काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपात प्रवेश केला व त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाली. तसेच कट्टर विरोधक मोहिते पाटीलच भाजपमध्ये आल्याने भाजपाबरोबर असलेल्या संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. माढ्यामधून आता राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि भाजपकडून नाईक निंबाळकर अशी थेट लढत होणार असे चित्र निर्माण झाले असतानाच अचानक विजयसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारीची चर्चा होऊ लागली आहे.