आज सायंकाळपासून आचार संहिता लागू होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणुक आयोगाकडून रविवारी सायंकाळी ५ वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात येणार असून त्या पाठोपाठ देशभरात आचार संहिता लागू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वृत्तपत्रे, टीव्ही वर भाजपने मोठमोठ्या जाहिरातींचा धुमधडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज साधारण २ जाहीर सभा सरकारी खर्चाने करीत आहेत. त्यावर विरोधकांनी टिका करुन पंतप्रधानांसाठीच निवडणुक आयोग लोकसभा निवडणुका जाहीर करायला उशीर करीत आहेत का असा आरोप करु लागले होते. २०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकांची  घोषणा ५ मार्चला झाल्या होत्या.

निवडणुक आयोगाने आज सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद बोलावली असून त्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात येईल. त्याच वेळी आचार संहिता लागू होणार आहे. देशात ७ ते ८ टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मुंबई, कोकण, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ अशा तीन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे.