क्षेत्रीय अधिका-यांच्या तयारीचा निवडणूक निरीक्षकांकडून आढावा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक युवराज नरसिंहन यांनी आज क्षेत्रीय अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात ही आढावा बैठक झाली. यावेळी भारत निवडणूक आयोगाच्या पोलीस विभागासाठीच्या निरीक्षक भवानीश्वरी, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी. उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार हेमा बडे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्री. नकासकर आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. नरसिंहन म्हणाले, आता प्रत्यक्ष निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. आता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याइतकीच महत्वाची भूमिका ही क्षेत्रीय अधिकारी आणि मतदान केंद्रांवरील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांची आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आयोगाने ठरवून दिलेल्या निर्देशांनुसार प्रत्येकाने काम करणे अपेक्षित आहे. मतदानाच्या दिवशी उमेदवार अथवा राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉक पोल करणे गरजेचे आहे. त्यानंतर ठीक ७ वाजता मतदान प्रक्रिया सुरु होईल, याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

क्षेत्रीय अधिकारी तसेच मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांचे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हाताळणी प्रशिक्षण निवडणूक यंत्रणेकडून देण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी व्यक्त केला. क्षेत्रीय अधिकार्‍यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांना भेटी देणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिनांकापूर्वीच आपापल्या कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रे कोठे आहेत, तेथे काही तांत्रिक अडचणी आहेत का, दूरध्वनी सुविधा आहे का, इतर अडचणी आहेत का, असल्यास त्यावर करण्यात येणार्‍या उपाययोजनांची तयारी पूर्ण झाली पाहिजे, असे ते म्हणाले, यावेळी त्यांनी तपशीलवार मतदान दिनांकाच्या दिवशी आणि त्यापूर्वीच्या दिवशी काय कार्यवाही करणे अपेक्षित आहे, याबाबत मार्गदर्शन केले.