मतदान केंद्रावर डमी पाठवणाऱ्या ‘त्या’ कर्मचाऱ्यावर गुन्हा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या एका कर्मचाऱ्याने निवडणुकीचे काम टाळण्यासाठी चक्क आडनावातील साम्य असलेल्या त्रयस्त व्यक्तीला पाठवले. विलास गणपती पाटील असे या कर्मचाऱ्याचे नाव असून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नायब तहसीलदार कृष्णा नाईक यांनी विलास पाटील विरुद्ध सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करणे, कर्तव्यात कसुरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला  हा प्रकार सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मणदूर येथील धनगरवाडा केंद्रावर उघडकीस आला.

नायब तहसीलदार कृष्णा नाईक यांनी दिलेल्या फिर्य़ादेनुसार, करुंगली येथील मातोश्री हिराबाई देशमुख प्राथमिक विद्यालयात विलास पाटील शिपाई म्हणून कार्यरत आहे. २३ एप्रिल रोजी झालेल्या लोकसभा मतदान प्रक्रियेसाठी त्याची मतदनीस म्हणून हातकणंगले मतदारसंघातील मणदूर केंद्रावर नियुक्ती झाली होती. पाटील याच्या नियुक्तीचा आदेश सांगली जिल्हाधिकारी यांनी काढला होता. मात्र पाटील हा प्रत्यक्षात आपल्या कामावर हजर नसल्याचे दिसून आले.

तहसीलदार गणेश शिंदे यांनी त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान पाटील याने आपल्या जागेवर लक्ष्मण पाटील नावाच्या त्रयस्त व्यक्तिला पाठवल्याचे समोर आले. लक्ष्मण पाटील याने दिवसभर काम करून भत्ता देखील घेतल्याचे स्पष्ट झाले. विलास पाटील याने कर्तव्यात कसुर केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...
You might also like