राज्यसभेच्या 55 जागांसाठी ‘निवडणूक’ जाहीर, महाराष्ट्रात 7 जागा, 26 मार्च रोजी मतदान

नवी दिल्ली : वृत्तसस्था – राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणुकीची घोषणा राष्ट्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. 55 जागांमध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश असून महाराष्ट्रासह 17 राज्यातील राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या 55 सदस्यांचा येत्या एप्रिलमध्ये कार्यकाळ संपत असल्याने या जागा रिक्त होत आहेत. रिक्त जागांसाठी 26 मार्च रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

राष्ट्रीय निवडणूक आयोगाने 5 जागांसाठीच्या निवडणुकीची घोषणा केली असून 6 मार्च रोजी अर्ज उपलब्ध होणार आहेत. तर 13 मार्चपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज सादर करायचे आहेत. 16 मार्चला अर्जाची छाननी होणार असून 18 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर 26 मार्च रोजी 55 जागांसाठी मतदानप्रक्रिया होणार असून सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ देण्यात आली आहे. त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होऊन नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांची घोषणा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात 7 जागा असून भाजप,शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून आता नवीन सदस्यांसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. कारण महाराष्ट्रात तीन पक्षांचे आघाडीचे सरकार आल्याने सर्व गणिते बदलली आहेत. महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण 19 जागा आहेत. महाराष्ट्रातील 288 आमदारापैंकी एका राज्यसभेच्या खासदाराच्या नियुक्तीसाठी 37 आमदारांच्या पाठिंब्याची गरज असते. विधानसभेतील सध्याचे चित्र पाहिल्यास भाजपचे 105 आमदार आहेत. तर शिवसेना 56, राष्ट्रवादी 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असल्याने सातव्या जागेवर शरद पवार हक्क सांगतिल असे बोलले जात आहे.