रणजितसिंहांचे भाषण ऐकण्यासाठी पवारांनी थांबवली बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. भाजपात प्रवेश केल्यानंतर रणजितसिंह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांचे भाषण ऐकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक थांबवल्याचे म्हटलं जात आहे. मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला सुरुंग लागल्याचं मानलं जात आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक होती. ही बैठक सुरू असतानाच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश सुरू होता. या प्रवेशावेळी याचं थेट प्रक्षेपण वृत्तवाहिन्यांवर सुरू होतं. यावेळी शरद पवार यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांचं पूर्ण भाषण ऐकलं. गेल्या 20 वर्ष राष्ट्रवादीत विविधं पदं उपभोगलेले रणजितसिंह आपल्या भाषणात भाजपचे गोडवे गाताना पवार ऐकत होते. रणजितसिंहांचं भाषण संपल्यानंतर पुन्हा माढा लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीला सुरुवात झाली.

आपल्या भाषणात रणजितसिंह काय म्हणाले ?

भाजपाचा झेंडा हाती घेतल्यानंतर आपल्या भाषणात रणजितसिंह म्हणाले की, “विधानपरिषदेमध्ये सदस्य असल्यापासून भाजपबरोबर आपुलकीचं नातं निर्माण झालं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात राज्य प्रगतीपथावर नेलं. सर्व पक्ष, गटतट बाजूला ठेवत सर्वांची कामे केली. माढा, सोलापूरमधील सिंचन प्रश्न, रेल्वेचे प्रश्न, पासपोर्ट कार्यालयाचे प्रश्नही सोडवले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे विविध रस्त्यांची कामे झाली. राष्ट्रवादीत असून कामे कशी होतात अशी टीकाही त्यावेळी आमच्यावर झाली.” याशिवाय अनेक मुद्दे मांडत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.