पश्चिम बंगाल, केरळसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; आचारसंहिता लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज (शुक्रवार) दिली. यंदाची ही निवडणूक CCTV च्या नियंत्रणाखाली होणार आहे. तसेच त्यासाठी सर्व राज्यात केंद्रीय पर्यवेक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. आजपासून आचारसंहिता लागू केली जाणार आहे.

दिल्ली येथील विज्ञान भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील अरोरा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, सध्या 18 कोटींपेक्षा जास्त मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पाच राज्यांतील विधानसभेच्या एकूण 824 जागांसाठी निवडणूक घेतली जात आहे. यंदा मतदानाचा कालावधी एक तासाने वाढवण्यात येणार आहे. तसेच नामांकन भरण्यासाठी फक्त दोन व्यक्तींनाच परवानगी दिली जाणार आहे. नामांकनाची ऑनलाईन सुविधाही दिली जाणार आहे. यंदाची निवडणूक CCTV च्या नियंत्रणाखाली होणार आहे. सर्व राज्यात केंद्रीय परिवेक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे.

‘रोड शो’साठी फक्त पाच वाहने

या पाच राज्यात निवडणूक होत आहे. त्यामुळे प्रचारसभा किंवा रोड शोसाठी फक्त पाच वाहनांनाच परवानगी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलही कार्यरत असणार आहे. तसेच घरोघरी प्रचारासाठी फक्त 5 लोकांनाच परवानगी असणार आहे. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे.

कोरोना योद्धांना सलाम

देशात कोरोना व्हायरसच्या महामारीने जनजीवन विस्कळीत झाले होते. पण या काळातही अनेकांनी आपले कर्तव्य पार पाडत काम केले. अशा या कोरोना योद्धांना आमचा सलाम, असेही ते म्हणाले.

निवडणूक कर्मचाऱ्यांना लस

देशात कोरोनाचे वाढते संकट पाहता या निवडणूक कार्यक्रमात समावेश असणाऱ्या सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. सर्व निवडणूक अधिकारी-कर्मचारी फ्रंटलाईन वॉरिअर्स असणार आहेत, असेही सुनील अरोरा यांनी सांगितले आहे.