… तोपर्यंत आपण निवडणूका जिंकू शकणार नाही, कॉंगेसचे नेते गुलाब नबी आझाद यांचा पक्षाला घरचा आहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फाईव्ह स्टार संस्कृतीमुळे (Five star culture) निवडणुका जिंकता येत नाहीत. आता पक्षाच्या नेत्यांना उमेदवारी मिळाल्यास ते थेट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जातात. त्यातही फाईव्ह स्टारमधील डिलक्सला प्राधान्य दिले जाते. त्यांना फिरण्यासाठी वातानुकूलित कार हवी असते. एखाद्या ठिकाणी कच्चा रस्ता असल्यास त्याठिकाणी नेते फिरकतच नाहीत.जोपर्यंत पक्षातील ही फाईव्ह स्टार संस्कृती संपत नाही, तोपर्यंत आपण निवडणुका जिंकू शकणार नाही, असे परखड मत व्यक्त करत गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

गुलाम नबी यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले आहे. त्यांनी नेतृत्वावर टीका केली नसली तरी पक्षात अनेक आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली आहे. कारण बदल न झाल्यास पक्ष आणि देश अडचणीत सापडेल असेही आझाद यांनी म्हटले आहे. तसेच पक्षात कोणतीही बंडखोरी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत आझाद बोलत होते.

काँग्रेसची अवस्था इतकी वाईट कशी झाली, यावरही आझाद यांनी विस्तृत भाष्य केले आहे. पहिल्यांदाच पक्षाची स्थिती इतकी दयनीय आहे. पक्षाच्या मोठ्या नेत्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला संवाद संपला आहे. फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये बसून निवडणूक लढवल्या जात नाहीत. आता एखाद्याला पद मिळाल्यास तो लगेच व्हिजिटिंग कार्ड, लेटरहेड छापतो. आता आपले काम संपले असे त्याला वाटते. मात्र खरंतर पद मिळाल्यापासून त्याच्या कामाला सुरुवात होते. पण ही जाणीव अनेकांना नसते, अशा परखड शब्दात त्यांनी पक्षाच्या कार्यपध्दतीवर भाष्य केले आहे.