अहमदनगर महानगरपालिका निवडणूकीसाठी उद्या होणार मतदान

अहमदनगर : पोलीसनामा आॅनलाईन – अहमदनगरमध्ये महानगरपालिका  महानगर पालिकेच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 351 उमेदवार रिंगणात आहेत. तर  2 लाख 56 हजार मतदार या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याचं समजत आहे. यासाठी एकूण 73 इमारतींमध्ये 337 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे  त्यातील 41 मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील आणि 137 संवेदनशील मतदान केंद्र आहेत.
या निवडणुकीसाठी 1 पोलीस अधीक्षक, 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 6 पोलीस उपअधीक्षकांसह 2 हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून 2 हजार निवडणूक कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत. या निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी अगदी चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
या निवडणुकीत  भारतीय जनता पार्टीने सर्वच्या सर्व म्हणजे 68 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. शिवाय  शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणिकीच्या रिंगणात उतरले आहेत तर  राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी करत एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे  भारतीय जनता पार्टीने 68 जागांवर दिलेल्या उमेदवारांमध्ये 35 महिला उमेदवार आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेने 61 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याचे समजत आहे. याशिवाय राष्ट्रवादीने 46 तर कॉंग्रेसने 21 उमेदवार या निवडणुकीसाठी मैदानात उतरवले आहेत.
अहमदनगर महानगरपालिकेची विशेष बाब अशी की, आजपर्यंत कुठल्याही पक्षाने 5 वर्षे महापालिकेवर सत्ता केलेली नाही. अडीच वर्षाच्या टर्मनंतर महापौरपदाची निवडणूक घेण्यात आली आहे. मुख्य म्हणजे अहमदनगर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचा पहिला महापौर झाला होता.
सदर निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि कॉंग्रेसचे युवा नेते सुजय विखे यांनी या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केल्याचे समजत आहे तर  भाजपचे खासदार दिलीप गांधी आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  त्यामुळे कधीही महानगरपालिकेत महापौर पद न मिळवलेल्या भाजपला एकहाती सत्ता मिळणार की राष्ट्रवादी आणि शिवसेना आपला झेंडा रोवणार याची उत्सुकता असणार आहे.