खुशखबर ! लवकरच वीज आणि CNG गॅस तब्बल 25 टक्क्यांपर्यंत स्वस्त होणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या काही महिन्यात वाढलेल्या महागाईनंतर जनतेसाठी एक चांगली बातमी आहे. जागतिक स्तरावर किमती घसरल्याने भारतात नैसर्गिक गॅसचे दर एप्रिलच्या सुरूवातीला 25 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. सरकारी तेल-गॅस  कंपनी ओएनजीसी आणि ऑईल इंडियाद्वारे उत्पादित नैसर्गिक गॅसच्या किमती 1 एप्रिलपासून 6 महिन्यांसाठी प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल यूनिट 2.5 डॉलर म्हणजे सुमारे 179.7 रुपयांपर्यंत घटू शकतात, ज्या सध्या 3.23 डॉलर म्हणजे सुमारे 232.2 रुपयांवर आहेत. भारताच्या सध्याच्या गॅस उत्पादनात ओएनजीसी आणि ऑईल इंडियाची भूमिका सर्वात मोठी आहे. ही 6 महीन्यांच्या आत नैसर्गिक गॅसच्या किमतीत होणारी दुसरी कपात असेल. यामुळे नैसर्गिक गॅसच्या किमती 2.5 वर्षातील सर्वात खालच्या स्तरावर पोहचतील.

काय-काय होणार स्वस्त
नैसर्गिक गॅसचा वापर खताचे उत्पादन, वीज तयार करणे, वाहनांसाठी वापरला जाणारा सीएनजी तयार करणे, याशिवाय स्वयंपाकाच्या गॅसमध्ये बदल करून केला जातो. नैसर्गिक गॅसच्या किमती घटल्याने सीएनजी सुद्धा स्वस्त होईल, कारण त्याच्या उत्पादनात नैसर्गिक गॅसचा सुद्धा उपयोग केला जातो. घरात वापरण्यात येणार्‍या पाइप्ड गॅसच्या किमतीतही घसरण होण्याची शक्यता आहे. दरवर्षी दोन वेळी नैसर्गिक गॅसच्या किंमतींचा आढावा घेतला जातो. प्रत्येक वर्षी 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरला आढावा घेतला जातो.

तेल-गॅस कंपन्यांवर होणार परिणाम
नैसर्गिक गॅसच्या किंमतीमधील कपातीमुळे भारतातील सर्वात मोठी गॅस निर्मिती कंपनी ओएनजीसीसह रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बीपी पीएलसीच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो, जी 2020 च्या मध्यापासून पूर्व किनारपट्टीत केजी-डी 6 ब्लॉकमध्ये शोध घेऊन गॅस उत्पादन सुरू करण्याची योजना आखत आहे. एका अंदाजानुसार किमतीमधील कपातीमुळे गॅस व्यवसायातील ओएनजीसीचे उत्पन्न सुमारे 3,000 करोड रुपये घटण्याची शक्यता आहे. ओएनजीसी भारतातील सर्वात मोठी एकात्मिक तेल आणि गॅस कंपनी आहे, जिचे कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅस उत्पादनात 75 टक्के योगदान आहे.