वीज बिलाप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक; राजू शेट्टींची वीजबिलाबाबत नितिन राऊत यांच्याकडे मागणी

कोल्हापूर/जयसिंगपूर : पोलीसनामा ऑनलाइन –   टाळेबंदीच्या काळातील घरगुती वीज बिले त्वरित माफ करावीत. शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत देऊन कृषिपंपांचे प्रलंबित वीज कनेक्शन त्वरित द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत माहिती घेऊन याबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासन दिले असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राजू शेट्टी यांना दिली आहे.

मुंबई फोर्ट येथे वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत राजू शेट्टी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे उपस्थित होते. त्यावेळी शेट्टी म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात ३१ मार्च २०१८ अखेर पेड पेंडिंग ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणाली अंतर्गत जोडण्या दिल्या जाणार होत्या. परंतु, आतापर्यन्त जवळपास ६३ हजार अर्जदारांच्या वीज जोडण्या प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांची पिके वाळत आहेत, त्यामुळे सर्व प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात.

कृषिपंप वीज ग्राहकांचे नवीन सवलतीचे शासकीय वीजदर निश्चित करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने लघुदाब उपसा सिंचन योजनांचा वीज आकार १.१६ रु. प्रति युनिट तर वैयक्तिक शेतीपंप वीज ग्राहकांचा सवलतीचा वीजदर १ रुपये प्रति युनिट निश्चित करावा. तसेच हे नवीन शासकीय सवलतीचे वीज दर एप्रिल २०२१ पासून लागू करावेत, असे सांगून शेट्टी यांनी विविध प्रलंबित प्रश्नांबाबत लक्ष वेधले.यावेळी शेतकरी संघटनेचे पोपट मोरे, महेश खराडे, राजू शेळके, अर्जुन साळुंखे, शैलेश चौगुले, संजय बेले, भागवत जाधव यांच्यासह विविध संघटेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.