वीजबिल माफीसाठी आजही विचारविनिमय सुरू, ऊर्जामंत्री राऊतांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्य सरकारने वीजबिलात सूट देण्याची घोषणा केली अन् त्यानंतर यू -टर्न घेत सर्वसामान्यांना वीजबिल भरण्यासाठी सक्ती केली. त्यामुळे राज्यात लॉकडाउनदरम्यान जनतेला आलेल्या भरमसाठ वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसे आक्रमक झाली. त्यानंतर सर्वसामान्यांतही ठाकरे सरकारविरोधात नाराजी पसरली. यावरून ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. वाढीव वीजबिल माफी करू अशी घोषणा आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर केली होती, असा खुलासा नितीन राऊत यांनी केला आहे. तसेच वीजग्राहकांना बिलमाफीसाठी आजही विचारविनिमय सुरू असल्याची माहितीदेखील राऊत यांनी यावेळी दिली आहे. ते एका वृतवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

नुकतेच कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण म्हटले होते की, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना जरा घाईच केली. त्यांनी घोषणा करण्याआधी पक्षात आणि सरकारशी चर्चा करायला हवी होती. मात्र, त्यांनी तसे कले नाही, ही आमच्याकडून चूक झाली, अशी कबुली चव्हाण यांनी दिली होती. त्यावर ऊर्जामंत्री राऊत यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. वीजबिल माफी हे केवळ एका खात्याचे काम नाही. हे सरकारचे काम आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत एमईआरसीला प्रस्ताव दिला. त्यानंतर वाढीव वीजबिल माफी करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर केली होती. वीजबिल माफी माझे व्यक्तिगत मत नव्हतेच, तो सरकारचा निर्णय होता, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

… हा कुठला न्याय आहे?

वीजबिलाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आलेली वीजबिल भरली आहेत, पण जनतेला सांगतात बिले भरू नका हा कुठला न्याय आहे?, असा सवालही राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे.

केंद्राने हक्काचा पैसा दिला नाही…

राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. केंद्राने राज्याच्या हक्काचा पैसा दिलेला नाही. राज्याने सगळी तिजोरी कोरोनाकडे वळवली आहे, असे राऊत म्हणाले. वीजबिलमाफीसाठी राज्य सरकारमध्ये कुणी अडचण आणण्याचा प्रश्न नाही. प्रश्न राज्याच्या अर्थव्यवस्थेचा असल्याचेही ते म्हणाले.