तीळ, म्हस किंवा मस्सा यासाठी खास ‘इलेक्ट्रोक्वाट्री उपचार’ पद्धती ! जाणून घ्या याची कार्यपद्धती आणि दुष्परिणाम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेक लोक हे त्वचेवरील तीळ, म्हस किंवा मस्सा, वॉर्ट (एचपीव्ही इंफेक्शन) स्किन टॅग अशा समस्यांमुळं निराश असतात. आज आपण यासाठीच्या एका खास उपचार पद्धतीबद्दल माहिती घेणार आहोत. इलेक्ट्रोक्वाट्री असं या उपचार पद्धतीचं नाव आहे.

इलेक्ट्रोक्वाट्री उपचार पद्धती म्हणजे नेमकं काय ?
इलेक्ट्रोक्वाट्री यालाच थर्मल क्वाट्री असंही म्हणतात. ही अगदी सोपी, जलद आणि कमी वेळेत होणारी उपचार पद्धती आहे. यात विशिष्ट विद्युत प्रवाहाचा वापर केला जातो आणि त्वचेवर नको असणाऱ्या विकृतींवर उपचार केला जातो.

कशी कार्य करते इलेक्ट्रोक्वाट्री प्रक्रिया ?
1) संबंधित त्वचेचा भाग आधी अल्कोहोल लावून स्वच्छ केला जातो. यानंतर ती जागा इंजक्शनच्या मदतीनं किंवा सुन्न करणाऱ्या क्रीमच्या मदतीनं बधीर केली जाते. इलेक्ट्रोक्वाट्री हे एक पेनासारखं उपकरण असतं. याच्या टोकावर सुईच्या आकाराचे धातूपासून बनवलेले प्रोब बसवलेले असतात.

2) याच प्रोब द्वारे उच्च वारंवारतेचा विद्युतप्रवाह लक्षित केंद्रावर वितरीत केला जातो. यामुळं त्वचा गरम होते आणि पृष्ठभागांवरील नको असलेल्या पेशी जाळून टाकते.

3) या प्रक्रियेदरम्यान होणारा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी वेगळ्या प्रोबचा वापर करून सामान्य त्वचेच्या पेशींवर उच्च विद्युतप्रवाह सोडला जातो. उपचार केलेल्या भागात एक जखम तयार होते. ही जखम दोन ते तीन आठवड्यात भरून निघते. मोठ्या किंवा अधिक काळ राहणाऱ्या जखमांना पुन्हा उपचारांची आवश्यकता भासू शकते. प्रक्रियेनंतर ताबडतोब त्या ठिकाणी अँटीबायोटीक मलम लावून त्यावर ड्रेसिंग केलं जातं.

या सगळ्यानंतर खालील काळजी घेणं आवश्यक आहे –
1) जखम लवकर बरी व्हावी यासाठी 24-48 तास ती कोरडीच ठेवावी. ओली करू नये.

2) त्यानंतर जखमेचा भाग स्वच्छ करण्यासाठी कोमल साबण आणि पाण्याचा वापर करता येऊ शकतो.

3) रोज दोन वेळा अँटीबायोटीक क्रीम आणि मॉईश्चरायजर लावणं गरजेचं आहे.

4) एकदा जखम बरी झाली की, त्वचेला सूर्यप्रकाशापासून वाचवणं गरजेचं आहे. त्यासाठी किमान एसपीएफ 30 असलेली सनस्क्रीन लावावी.

इलेक्ट्रोक्वाट्री उपचार पद्धतीचे दुष्परिणाम –
1) इलेक्ट्रोक्वाट्री उपचार पद्धती ही अत्यंत सुरक्षित प्रक्रिया आहे. त्यामुळं याचे दुष्परिणाम सहजासहजी दिसून येत नाहीत.

2) प्रक्रिये दरम्यान होणारे दुष्परिणाम (उदा. जळजळ, वेदना किंवा सभोवतालच्या त्वचेवर येणारा लालसरपणा) तात्पुरते राहतात आणि दोन ते तीन दिवसात आपसूकच बरे होतात.

3) उपचारानंतर व्रण, पांढरे अथवा काळे डाग सहजासहजी दिसून येत नाहीत.

4) रक्त जैवसंक्रमणाचाा धोका संभवत नाही.

5) डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन न केल्यास जखमेवर इंफेक्शन होऊन जखम बरी होण्यास अधिक कालावधी लागू शकतो. त्यामुळं डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं काळजीपूर्वक पालन केलं जाणं गरजेचं आहे.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.