गर्भवती हत्तीणीचा मृत्यू : मनेका गांधीनी साधला राहुल यांच्यावर निशाणा, म्हणाल्या…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  गर्भवती हत्तीणीच्या तोंडात फटाके फुटल्यामुळे तिच्या गर्भाशयात वाढणार्‍या पिलासह तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

मेनका गांधींनी केरळमधील वायनाडमधून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना निशाण्यावर घेतले. वन विभागाच्या सचिवांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी. त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण खात्याच्या मंत्र्यांना थोडीजरी समज असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असे गांधी म्हणाल्या आहेत. ‘काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्याच भागातील आहेत, त्यांनी अद्याप कारवाई का केली नाही?’ असा प्रश्नही मनेका गांधी यांनी विचारला. दरम्यान, केंद्र सरकारनेही आता या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. केरळमध्ये हत्तीणीच्या झालेल्या हत्येची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची कसून चौकशी करुन दोषींना ताब्यात घेतले जाईल व कठोर कारवाई केली जाईल. फटाके खायला देऊन हत्या करणे ही भारताची संस्कृती नाही, असे केंद्रीय वनमंत्री तथा पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. प्राण्यांसाठी काम करणार्‍या ह्यूमन सोसायटी इंटनॅशनल/इंडियाने या घटनेसाठी दोषी असणार्‍यांची माहिती देणार्‍याला 50 हजार रुपये बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय हत्तीणीच्या मृत्यूसाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे.