कुस्तीपटू गीता फोगाटचा संताप, म्हणाली – ‘मानवाच्या पापांचा घडा भरतोय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – फटाक्यांनी भरलेले फळ खायला दिल्यामुळे केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यात एका गर्भवती हत्तीणीला प्राण गमवावे लागले. ही घटना 27 मे रोजी घडल्याची माहिती वन-विभागाच्या अधिकार्‍याच्या फेसबूक पोस्टमुळे प्रसारमाध्यमांमध्ये आली. या घटनेचा निषेध केला जात असून राजकीय स्तरावरही याची दखल घेण्यात आली असून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी चौकशाीचे आदेशा दिले आहेत.

याप्रकरणी भारतीय कुस्तीपटू गीता फोगाट हिने तीव्र शब्दात राग व्यक्त केला आहे. ही घटना पाहून असे वाटतंय की मानव जातीच्या पापांचा घडा भरतो आहे. संपूर्ण माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असल्याचे तिने नमूद केले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही घटनेचा शोक व्यक्त केला आहे. विराटने सोशल मीडिया अकाऊंटवर घटनेचा निषेध व्यक्त केला असून प्राण्यांनाही प्रेमाची वागणूक मिळायला द्या, असे आवाहन केले आहे. अनेक सेलिब्रिटींनी या प्रकाराबद्दल चीड व्यक्त केली असून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे. हत्तीणीच्या मृत्यूसाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे. वन-विभागानेही मारेकर्‍यांचा शोध सुरु केला असून दोषी व्यक्तींना लवकरात लवकर अटक केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.

नेमकी ही घटना कधी घडली हे सांगता येणार नाही, पण अंदाजानुसार 20 दिवसांपूर्वी हत्तीणीने हे फळ खाल्ले असावे, भुकेमुळे तिची झालेली अवस्था आणि वेदना सहन होत नसल्यामुळे ती ज्या पद्धतीने धावपळ करत होती यावरुन हा अंदाज बांधण्यात आला आहे, असे केरळचे स्थानिक वन अधिकारी आशिक अली यांनी सांगितले आहे.