धनगरवाड्यात हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ

आजरा : पोलीसनामा ऑनलाइन – आजरा तालुक्यातील आवंडी धनगरवाडा येथे मंगळवारी रात्री हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालून  तीन एकर शेतातील ऊस पिकाचे नुकसान केले आहे.

रानबा दारुटे, सुरेश निकम, रामचंद्र मांगले, अमृत मांगले, संतोष दारुटे, बबन दारुटे, चंद्रकांत निकम या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हत्तीच्या कळपाने धुमाकूळ घातला. उसाबरोबरच केळी, मेसकाठी या पिकांचेही हत्तीच्या कळपाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

हत्तीचा कळप रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आवंडी परिसरात आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत या कळपाने शेतातील उसाची नासधूस केली. कळपाने तीन एकरातील ऊस पिकाचे नुकसान केले.

आजरा तालुक्यातील पश्चिम भागात गेली अनेक वर्षे टस्कर ठाण मांडून आहे. या टस्कराने पश्चिम भागातील देवर्डे, हाळोली, मसोली, वेळवट्टी, सुळेरान, धनगरमोळा या परिसरातील पिकांचे नुकसान केले आहे. शासनाकडून पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाते; मात्र या टस्काराला हुसकावण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही, त्यामुळे टस्कराकडून होत असलेले नुकसान नित्याचीच बाब झाली आहे.

टस्करामुळे हैराण झालेल्या पश्चिम भागाबरोबरच आता तालुक्यातील जेऊर, चितळे, चाफवडे, पोळगाव, कासार कांडगाव या परिसरात हत्तीच्या कळपाने प्रवेश करून शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर घातली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी हा कळप आजरा तालुक्यात दाखल झाला आहे. तीन हत्ती व एक पिल्लू या कळपात आहे. कासार कांडगाव जवळील गणेशवाडी जवळ हा कळप आला होता.

गावाजवळ आलेल्या या कळपाला ग्रामस्थांनी व वन खात्याने हुसकावून लावले होते; मात्र पुन्हा हा कळप तालुक्यात दाखल झाला आहे. या कळपाने आता पुन्हा नुकसानीचे सत्र सुरू केले आहे. एका टस्कराला हुसकावण्यात अपयशी ठरलेले वन खाते आता या कळपाचे काय करणार? हा चिंतेचा विषय बनला आहे. वन खात्यालाही हा कळप डोकेदुखी ठरत आहे.