एल्गार परिषद प्रकरणी पुण्यातील कबीर कला मंचच्या 3 कलाकारांना NIA नं केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एल्गार आणि भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) पुण्यातून कबीर कला मंचची कार्यकर्ती ज्योती जगताप हिला अटक केली. याच प्रकरणात सोमवारी रात्री एनआयएने रमेश गायचोर व सागर गोरखे यांना मुंबईत अटक केली आहे.

पुण्यात 31 डिसेंबर 2017 ला शनिवार वाड्यावर एल्गार परिषद पार पडली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2018 ला भीमा कोरेगाव येथे दोन समाजात दंगल उसळली होती. दरम्यान एल्गार परिषदेला माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी या गुन्ह्यात माओवाद्यांशी संबंध उघडकीस आणत अनेकांना अटक केली. तर या एल्गार परिषद काही संघटनानी मिळून आयोजित केली होती. त्यात कबीर कला मंचचा देखील समावेश होता.
हा गुन्हा आता एनआयएकडे तपासासाठी वर्ग केला असून, एनआयए तपास करत असताना त्यांनी सोमवारी आणि आज मुंबई व पुण्यात कारवाई करताना सागर तात्याराम गोरखे (वय ३२,रा. वाकड), रमेश मुरलीधर गायचोर (वय ३६, रा. येरवडा), ज्योती राघोबा जगताप (वय ३३,रा. कोंढवा) यांना अटक केली आहे.

या तिघांचा भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तिघांना मुंबईतील ‘एनआयए’ च्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना मंगळवारी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना चार दिवस ‘एनआयए’ कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. तिघांविरोधात बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा (यूएपीए), कट रचणे तसेच अन्य कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

तत्पूर्वी एनआयएकडे तपास जाण्यापूर्वी या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. गोरखे, गायचोर, जगताप यांच्या विरोधातही पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. ‘एनआयए’ने या प्रकरणात आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा, प्रा. हनी बाबू यांना अटक केली होती. तपासात गायचोर, गोरखे, जगताप बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी संबंधित असून ते पुण्यातील कबीर कला मंचचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी शाहिरी कार्यक्रमातून माओवादी विचारधारा तसेच समाजात तेढ निर्माण करणारी गीते सादर केली. शहरी भागात माओवादी विचारधारेचा प्रसार करणारा फरार आरोपी मिलींद तेलतुंबडे याच्या संपर्कात ते आले होते. गडचिरोलीतील जंगलात त्यांनी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. एल्गार परिषदेच्या आयोजनात त्यांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर अटक करण्यात आली. असे ‘एनआयए’तील अधिकाऱ्यांनी सांगितले.