माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून ‘या’ कवी ला तेलंगणा येथून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपावरून कवी वरवरा राव यांना पुणे शहर पोलिसांनी तेलंगणाच्या हैद्राबाद मधून पुन्हा अटक केली आहे. त्यांना रविवारी शिवाजीनगर न्यायालायात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांनी दिली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

याप्रकरणात दि. ६ जून रोजी सुरेंद्र गडलिंग, प्रा.शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन यांना अटक करण्यात आलेली होती. सध्या ते सर्व जण न्यायालयीन कोठडीत आहेत. दि. २८ आॅगस्टला कवी वरवरा राव, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीचे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा, मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, व्हर्णन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना अटक केली होती. मात्र सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांच्या ट्रान्झिट रिमांडला उच्च न्यायालयाने तातडीने स्थगिती दिल्याने त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. वरवरा राव, अरुण फरेरा आणि गोन्सालवीस यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र त्यांना देखील पोलीस कोठडी न देता नजरकैदेत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानंतर नवलाखा यांची नरजकैदेतून सुटका करण्यात आली तर इतर आरोपी अद्याप नजरकैदेत आहेत.
दरम्यान, गडलिंग, सेन, राऊत, ढवळे आणि विल्सन यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यातील सेन यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणातील दहा आरोपींच्या विरोधात गुरुवारी (दि. १४) पुणे पोलीसांनी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अटक करण्यात आलेले सुधीर ढवळे, रोना विल्सन, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, सुरेंद्र गडलिंग आणि भूमिगत असलेले कॉ. एम ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे, किशनदा ऊर्फ प्रशांत बोस, प्रकाश ऊर्फ नवीन ऊर्फ रितुपण गोस्वामी, कॉ. दिपु आणि कॉ. मंगलु अशा दहा जणांविरोधात ५१६० पानी दोषारोपत्र न्याायालयात दाखल केले. त्यात ८० साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.