एल्गार प्रकरण : तपासासाठी राज्य शासन SIT नेमण्याच्या विचारात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एल्गार प्रकरणात राज्य सरकार एसआयटी स्थापन करण्याच्या विचारात असून, त्याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात येत आहे. कायदेतज्ञांनी त्याबाबत अनुकुल अहवाल दिल्यानंतर राज्य सरकार एल्गार आणि माओवाद प्रकरणाचा समांतर तपास करेल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे सांगितले.

पुणे पोलीस आयुक्तालयाला शनिवारी त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी देशमुख म्हणाले, कोरेगाव भीमा आणि एल्गारच्या तपासाबाबत शरद पवार यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याबाबत पत्र दिले होते. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी केंद्र सरकारने हा तपास एनआयएकडे देण्याबाबत हालचाली सुरू केल्या. केंद्र सरकारला हा तपास एनआयएकडे द्यायचा होता, तर त्यांनी राज्य सरकारला विश्वासात घ्यायला हवे होते. तपास एनआयएकडे देण्याला आमचा विरोध नव्हता. पण, विश्वासात न घेताच त्यांनी तपास काढून घेतला. केंद्राने हे प्रकरण ओढवून घेतले आहे. त्यांनी लवकर तपास करावा अशी अपेक्षा आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी तपास एनआएयकडे देण्यास सहमती दर्शवून शरद पवार यांना ओव्हरटेक केले का, या प्रश्नावर बोलण्यास देशमुख यांनी टाळाटाळ केली. त्यासोबतच एल्गार आणि कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीबाबत पुणे ग्रामीण पोलीसांकडून वेगवेगळे 20 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचा तपास हा ग्रामीण पोलीसच करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.