शहरातील तरुणांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ‘एल्गार’ परिषद

पुणे : पोलिसानामा ऑनलाईन

चळवळीसाठी माओवाद्यांना पूर्वीप्रमाणे ग्रमीण भागातून तरुणांचा मिळणारा पाठिंबा आता मिळत नाही. त्यामुळे माओवाद्यांनी शहरातील बुद्धीवान तरुणांना चळवळीत ओढण्यासाठीच एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले असावे असे मत नक्षलग्रस्त भागात अनेक वर्षे कार्यरत असणारे सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी व्यक्त केले.

सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम हे नक्षलग्रस्त भागात अनेक वर्ष कार्यरत होते. माओवाद्यांच्या चळवळीविषयी सांगताना ते म्हणाले, माओवाद्यांच्या चळवळीसाठी पूर्वी ग्रामीण भागातील तरुणांचा कल होता, परंतु सध्या असे राहिलेले नाही. क्रांती घडवण्यासाठी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील आपल्या विचारसरणीला पाठिंबा देणा-यांना तयार करण्याची गरज माओवाद्यांना वाटू लागली आहे. तसेच शहरी भागातून बुद्धीवान तरुणांना या चळवळीत ओढण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. कबीर कला मंचामधील तरुणांना अशाच पद्धतीने आपल्या जाळ्यात ओढले आहे. यातील काही तरुण नक्षलग्रस्त भागात गेले असून काहीजण अजूनही या संघटनेचे काम करीत आहेत.

शहरातील संघटनांमध्ये असलेल्या तरुणांना हेरुन त्यांच्यात आपली विचारसरणी बिंबवण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी सुरु आहे. पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये कबीर कलामंचचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या कार्यकर्त्यांनी एल्गार परिषदेत सुरुवातीला क्रांतीसंबंधित गाणी सादर केली होती. यानंतर अनेक नेत्यांनी भडकाऊ भाषणे केली. त्यामुळेच कोरेगाव भीमा येथे दंगल झाली, अशी फिर्याद तुषार दामगुडे यांनी केली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना एल्गार परिषदेसाठी माओवाद्यांचा पैसा आणि हात असल्याचे निष्पन्न झाले.

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत अनेक संघटनांचे कार्यकर्ते आले होते. या परिषदेत शिरकाव करुन त्यातील काही तरुणांना आपल्याकडे ओढण्याचा आणि शहरी भागात सरकारविरोधात वातावरण तयार करण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग असू शकतो. एल्गार परिषद  हा त्यांच्या रणनितीचा एक भाग असू शकतो, असे आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यावरुन दिसत असल्याचे सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी सांगितले.