‘एल्गार’च्या पुणे पोलिसांच्या तपासाची होणार ‘चौकशी’, गृहमंत्रालयाने मागविली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – शनिवारवाड्यासमोर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात तसेच कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीमध्ये बंदी असलेल्या माओवादी संघटनेचा सहभाग असल्याचे दाखवून पुणे पोलिसांनी केलेल्या तपासाची आता एसआयटी मार्फत चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने गृह मंत्रालयाने पुणे पोलिसांकडे माहिती मागविली असून ही माहिती सरकारकडे देण्याबाबत सध्या पुणे पोलीस आयुक्तालयात कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु आहेत. ही माहिती देताना काय काय माहिती द्यावी, याबाबत कायदेशीर सल्लाही पुणे पोलिसांकडून घेतला जात आहे.

कोरेगाव भीमाची दंगल हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडविलेले षडयंत्र होते. दंगलीच्या मुख्य सुत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचा हा डाव होता. या प्रकरणाची आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत एसआयटीची स्थापना करुन चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दोन पानी पत्र लिहिले असून त्यात ही मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे २०० वा विजयी दिवस साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येने दलित बांधव जमले होते. काही समाजविघातक घटकांकडून मेळावा उधळण्याचा प्रयत्न झाला. त्यातून दंगल उसळली. मात्र, पोलिसांनी दंगलीस आदल्या दिवशी पुण्यात शनिवारवाडासमोर झालेल्या एल्गार परिषदेतील चिथावणीखोर वक्तव्ये कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढला. तसेच दंगल घडविण्यात माओवादी संघटनेचा हात असल्याचा दाखवून त्यांच्याशी संबंध असल्याच्या संशयावरुन अनेकांना अटक केली. केंद्र सरकार आणि व्यवस्थेविरोधात संघर्ष करणाऱ्या बुद्धिजीवी, प्रतिष्ठित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांचे अटकसत्र सुरु केले.

पवार यांनी या पत्रात म्हटले आहे की, तत्कालीन राज्य सरकारने सत्तेचा बेसुमार गैरवापर केला. प्रसार माध्यमांमध्ये गैरप्रचार करुन जनतेचा संभ्रम आणि संशयाचे धुके निर्माण केले. पोलीस तपासाची भिस्त इलेक्ट्रॉनिक पुराव्यांवर आधारित होती. पोलिसांनी संगणकीय उपकरणात छेडछाड करणे, पुरावे नष्ट करणे, खोटे पुरावे तयार करणे अशा बेकायदेशीर गोष्टी केल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करणे आवश्यक आहे.

कोरेगाव भीमाची दंगल घडविल्याचा आरोप असलेले डॉ. आनंद तेलतुंबडे, पी वरवरा राव, सुधीर ढवळे, अ‍ॅड़ सुरेंद्र गडलिंग, गौतम नवलाखा, शोमा सेन, रोमा विल्सन, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, बर्मन गोन्साल्विस हे उच्च शिक्षित असून ते सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. काही जण मानवाधिकार कार्यकर्ते असल्याकडे पवार यांनी या पत्रात लक्ष वेधले आहे.

शरद पवार यांच्या मागणीमुळे आता एल्गार परिषदेच्या आतापर्यंत झालेल्या तपासाची चौकशी होणार हे निश्चित झाले असल्याचे मानले जाते. त्यासाठी एल्गार परिषदेच्या तपासाबाबतची माहिती मागविण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –