नव्या कृषी कायद्यांविरोधात राज्यातही तीव्र आंदोलन !

मुंबई/औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – नव्या कृषी कायद्यांविरोधातील देशव्यापी आंदोलन सुरु आहे. एकचि सर्वाधिक तीव्रता उत्तर भारतात दिसत असून तेथील शेतकऱ्यांचे आंदोलन गेल्या आठवड्यापासून दिल्लीच्या सीमेवर सुरु आहे. अद्यापपर्यंत सरकारकडून कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आली नाही. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात गुरुवारी उग्र आंदोलन करण्याचा निर्धार अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीसह विविध शेतकरी संघटनांनी केला आहे. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी आज एल्गार पुकारणार आहेत.

शेतकरी नेते राजू शेट्टी, डॉ. अशोक ढवळे, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, नामदेव गावडे, सीमा कुलकर्णी, सुभाष लोमटे, डॉ. अजित नवले आदींच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार असून राज्यातील समविचारी शेतकरी संघटना तसेच शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला संघटनांचे कार्यकर्ते सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर मोर्चे काढून तथा ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.

काँग्रेसचे आज राज्यव्यापी आंदोलन
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून या कायद्यांविरोधात शेतकरी एकवटला आहे. त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सरकारने पोलीस बाळाचा वापर करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलक मागे हटले नाही जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे. आता या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस पक्ष गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

साहित्यिकांचा पाठिंबा
कृषी कायद्यासह इतर अनेक मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठींबा दिला आहे. त्यातच प्रसिद्ध साहित्यिकांनी देखील या आंदोलनासंदर्भात आपली भूमिका जाहीर केली आहे. विविध मागण्यांसाठी एकवटलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे, हे आपले कर्तव्यच आहे, अशी भूमिका काही प्रसिद्ध साहित्यिकांनी घेतली आहे.