महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आक्रमक ! कृषी कायद्याविरोधात आज रास्ता रोको, संघटना एकवटल्या

मुंबई : दिल्लीतील नव्या कृषी कायद्याविरोधातील शेतकर्‍यांचे आंदोलन वाढत चालले असतानाच आता महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आक्रमक झाला आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीसह विविध शेतकरी संघटना आज राज्यात तीव्र आंदोलन करणार आहेत. तसेच मोदी सरकारच्या कृषी धोरणाला विरोध करण्यासाठी राज्यातील काँग्रेस देखील आज रस्त्यावर उतरणार आहेत.

शेतकरी नेते राजू शेट्टी, डॉ. अशोक ढवळे, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, नामदेव गावडे, सीमा कुलकर्णी, सुभाष लोमटे, डॉ. अजित नवले आदींच्या नेतृत्वात राज्यातील सर्व समविचारी शेतकरी संघटना नव्या कृषी कायद्याविरोधात एकवटल्या आहेत. आज शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला संघटनांचे कार्यकर्ते सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर मोर्चे काढून तसेच सर्वत्र रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.

काँग्रेसही करणार राज्यव्यापी आंदोलन
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस पक्ष आज गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.

साहित्यिकांचा शेतकर्‍यांना पाठिंबा
दिल्लीत सुरू झालेले आंदोलन आता देशभरात पसरू लागले असून सर्वच स्तरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. साहित्यिक, खेळाडू, अभिनेते इत्यादिंनी या आंदोलनाला पााठिंबा दिला आहे. कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे एकवटलेल्या शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्यच आहे, अशी भूमिका काही प्रसिद्ध साहित्यिकांनी मांडली आहे.

You might also like