एल्गार परिषद प्रकरण : पुणे पोलिसांकडून नोयडातील संशयितांच्या घराची झडती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एल्गार परिषदेच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी नोयडा येथील हॅनी बाबू एम टी (वय-४५) यांच्या घराची झडती घेतली. या कारवाईत घरातून काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या असून यामध्ये कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

एल्गार परिषदेमध्ये माओवाद्यांचा संबंध असल्याचा आरोप करत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सुधीर ढवळे, सुरेंद्र गडसिंग, शोमा सेन, अरुण फरेरा, वर वरा राव, महेश राऊत, व्हार्नोन गोन्सालविस, सुधा भारद्वाज, रोना विल्सन यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पुण्यातील सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरु आहे.

पुणे पोलिसांच्या एका पथकाने नोयडा येथील हॅनी बाबू एम टी यांच्या घराची झडती घेतली. या कारवाईसाठी पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांची मदत घेतली. या कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले आहे. तसेच या तपासणीचे कारण देखील बाबू यांना सांगण्यात आले आहे. बाबू यांच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंची यादी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार आणि सायबर यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.

आरोग्यविषयक वृत्त –