एल्गार परिषद : शर्जिल उस्मानी पुन्हा पोलीस चौकशीला हजर राहणार

पुणे : एल्गार परिषदेत धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी शर्जिल उस्मानी पुन्हा एकदा पुणे पोलिसांसमोर हजर राहणार आहे. येत्या १८ मार्च रोजी तो स्वारगेट पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दुसऱ्यांदा उपस्थित राहणार आहे.

एल्गार परिषदेतील वक्तव्यावरुन दाखल झालेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शर्जिल उस्मानी याने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. त्यांच्या सुनावणी दरम्यान पोलिसांच्या समन्सानुसार उस्मानी १८ मार्च रोजी पोलिसांसमोर चौकशीला हजर राहिल, अशी ग्वाही त्यांच्या वतीने अ‍ॅड. मिहिर देसाई यांनी दिली.

आम्ही कायदेशीर प्रक्रियेचे पालन करुन आरोपी शर्जिल उस्मानीला नोटीस बजावत आहोत. त्याप्रमाणे तो चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहिला आणि त्याने चौकशीत सहकार्य केले तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार नाही, अशी माहिती पुणे पोलिसांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. त्यानंतर शर्जिल चौकशीसाठी हजर राहिल असे सांगण्यात आले.

कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे कार्यवाही करण्याचे पोलीस म्हणत असतील तर सध्या अटकेपासून संरक्षण देण्याचा प्रश्न उदभवत नाही, असे निरीक्षण खंडपीठाने सर्व बाजू ऐकल्यानंतर नोंदवले. खंडपीठाने याविषयी पुढील सुनावणी २२ मार्च रोजी ठेवली आहे.