‘एल्गार’ परिषद प्रकरणात अटकेत असलेले कवी-कार्यकर्ते वरवरा राव ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एलगार परिषद व कोरेगाव भीमा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले संशयित आरोपी कवी वरवरा राव यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यामध्ये त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वरवरा राव यांचा विशेष एनआरए न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून वरवरा राव (वय-81) यांनी जामिनावर सुटकेसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, 26 जून रोजी विशेष न्यायालयाने अर्ज फेटाळला होता.

माओवादी चळवळीशी संबंधित असण्याचा आरोप राव यांच्यावर आहे. मुंबईच्या कारागृहात असताना त्यांची तब्येत बिघडली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डिसेंबर 2017 मध्ये भीमा कोरेगावला झालेल्या दंगलींना एल्गार परिषदेमुळे प्रोत्साहन मिळालं, असा आरोप आहे. तेलगु कवी आणि कार्यकर्ते असलेल्या राव यांना पोलिसांनी अटक केली होती. कारागृहात असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना आता मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये हलवण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राव मागील दोन महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर तळोजा कारागृहातील रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्यांना लवकर चांगल्या रुग्णालयात भरती करावे, अशी मागणी राव यांच्या कुटुंबीयांनी राज्यासह केंद्र सरकारकडे केली होती. सोमवारी रात्री त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.