एल्गार परिषदेवरुन पुण्यात वादाची ‘ठिणगी’ ! ब्राह्मण महासंघाने केली ‘ही’ मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात एल्गार सांस्कृतिक परिषद (Elgar parishad, pune) होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. एल्गार परिषदेला परवानगी मिळावी यासाठी स्वारगेट पोलीस (Swargate Police) ठाण्यात अर्ज करण्यात आला आहे. तर दुसरीकडे एल्गार परिषदेला सर्वांगीण अभ्यास करुनच परवानगी द्यावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी केली आहे. त्यामुळे कोरोना काळात एल्गार परिषदेवरुन वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.

1 जानेवारी रोजी कोरेगाव-भिमा येथे हजारो लोक मानवंदना देण्यासाठी येत असतात. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी कोणत्याही राजकीय सभा किंवा पुस्तकांचे स्टॉल उभारण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

आनंद दवे यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, पहिल्या एल्गारची जेव्हा जाहिरात केली जात होती. भित्ती पत्रके, बॅनर लावले जात होते. त्यावरील मजकूर वाचून त्यातून जातीय भावना दुखावल्या जाण्याची भिती आम्ही त्यावेळीही व्यक्त केली होती. त्यास परवानगी देऊ नये अशी अशी विनंती आम्ही शासनाकडे त्या वेळेसही केली होती. पुन्हा एकदा एल्गारची तयारी होत असल्याचे समजत आहे.

दवे पुढे म्हणाले, आयोजक, वक्ते, विचार हे सर्व जर तेच असतील तर पुन्हा त्या व्यासपीठावरून त्याच भूमिका मांडल्या जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी शासनाने सर्व बाबी तपासून परवानगी दिली पाहिजे. भाषणास चौकट घालून बंदिस्त करता येत नाही, बोलणारा बोलून जातो आणि रेकॉर्डिंग मागवले आहे, चौकशी करु हे सरकारी उत्तर ठरलेले असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सभेचा अधिकार मान्य करुन प्रशासनाने सर्वांगीण विचार करुनच परवानगी देण्याची मागणी आनंद दवे यांनी केली आहे.