मानवाच्या मेंदूत कॉम्प्युटर चीप बसवण्यासाठी मस्क यांच्या स्टार्टअपचं संशोधन, ‘या’ गंभीर आजारातून होवू शकते सुटका
पोलीसनामा ऑनलाइन – टेस्ला कंपनीचे संस्थापक इलॉन मस्क यांची न्यूरालिंक ही न्यूरोसायन्स स्टार्टअप कंपनी मानवाच्या मेंदूशी संबंधित असलेल्या आजारातून रुग्णाला पूर्णरीत्या बरे करण्यासाठी एक नवे तंत्रज्ञान विकसित करत आहे. शुक्रवारी न्युरालिंकने एक डुक्कर सर्वांसमोर आणले असून, मागच्या दोन महिन्यांपासून या डुक्कराच्या मेंदूत छोट्या नाण्याच्या आकाराची कॉम्प्युटर चिप बसवण्यात आली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिलं आहे.
मस्क यांनी २०१६ साली सॅन फ्रान्सिस्कोमध्ये न्युरालिंकची स्थापना केली. चिपच्या माध्यमातून मानवी मेंदूत वायरलेस कॉम्प्युटर बसवण्याचा न्युरालिंकचा उद्देश आहे. स्पायनल कॉर्डच्या दुखापती, डिमेंशिया, अल्झायमर या मानवी मेंदूशी निगडित आजरांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना बरे करण्यासाठी मदत करणे न्युरालिंकचे उद्दिष्ट आहे. चिप इम्प्लान्ट तंत्रज्ञान हे मानवी आजार बरे करण्याच्या लक्ष्याच्या दिशेने एक प्रारंभीचे पाऊल आहे.
वेबकास्टमध्ये शुक्रवारी बोलताना मस्क यांनी ‘स्मृतिभ्रंश, नैराश्य आणि इंसोमेनिया या आजरांचा उल्लेख केला. ही चिप म्हणजे मानवी शरीरातील एक प्रकारची कृत्रिम बुद्धिमत्ता असेल. इम्प्लांटेबल उपकरणांमुळे वास्तवात या समस्यांचे निराकरण होऊ शकते असे मस्क यांनी सांगितलं. “पैसे जमा करणे हा आमचा हेत नसून, महान व्यक्तींनी न्युरालिंकमध्ये येऊन काम करावे, त्यासाठी प्रयत्न करत’ असल्याचं मस्क म्हणाले.
Live webcast of working @Neuralink device
Friday 3pm Pacific https://t.co/PouLbrGzFU— Elon Musk (@elonmusk) August 26, 2020
टेस्ला कंपनीचे संस्थापक असलेले इलॉन मस्क हे सातत्याने नवीन शोध घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांची टेस्ला कंपनी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करते. तसेच त्यांनी स्पेसएक्सच्या मार्फत अवकाश संशोधन क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. वाहतुकीला वेगवान पर्याय देणारे हायपरलुप तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले आहे. अमेरिकेत हायपरलुपच्या अनेक यशस्वी चाचण्या झाल्या आहेत.