‘ही’ उलथापालथ समाजासाठी घातक, देशात आणीबाणीसदृश्य परिस्थिती : मेधा पाटकर

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – विकासाच्या नावावर वाट्टेल तशी मोडतोड करण्याचे काम केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. यात केवळ घरेदारेच नव्हे तर नातीही तोडली जात आहेत. ही उलथापालथ समाजासाठी घातक असून यामुळे देशात आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप ज्येष्ठ समाजसेविका तथा नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केला. येथील राष्ट्रभाषा भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी पाटकर म्हणाल्या की, आंदोलनांमध्ये धुळ्यातील पुरोगामी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. जनआंदोलनांशी जोडलेली माणसे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे धुळ्यात आल्यावर मला माहेरी आल्यासारखे वाटते. विविध प्रश्नांसाठी धुळ्याची जनता पूर्वी जशी विविध आंदोलनांमध्ये सहभागी होत होती, तशीच गरज आज निर्माण झाली आहे. देशातील एकूणच चित्र पाहिले असता परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अनेक आव्हाने वंचित समुदायासमोर उभी ठाकली आहेत.

सत्ताधीशांपुढे आपण झुकत राहिलो तर घटनेने आपल्याला बहाल केलेल्या कर्तव्याला चुकल्यासारखे होईल. या समस्यांचे मूळ कशात आहे, हे आपल्याला शोधण्याची गरज आहे. केवळ सरकारमधला पक्ष बदलला म्हणून देशात परिवर्तन झाले, असे आपल्याला म्हणता येत नाही. आज देशाच्या नियोजनाचा मोठा प्रश्न उभा आहे.