धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना लिहिले असे भावनिक पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- शेतकरी आणि मजुरांच्या विविध मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने शेतकऱ्यांचा लाँग मार्च पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे दिसत आहे. आज सकाळी 9 वाजता हा लाँग मार्च नाशिकमधून सुरू झाला आहे. आपल्या विविध मागण्या घेऊन हजारो शेतकरी मुंबईकडे कूच करत आहेत. याच शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फेसबुकवर त्यांनी हे पत्र लिहित आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या या लाँग मार्चला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले आहे.

धनंजय मुंडे आपल्या पत्रात लिहितात…

माझ्या प्रिय,
शेतकरी बांधवांनो

खेड्या-पाड्यात राहणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांचा आवाज सत्तेत असलेल्या शेठ लोकांपर्यंत पोहोचतच नाही. त्यांमुळे घामात भिजलेले, कष्टाने काटकुळे झालेले त्यांचे देह मागच्या वर्षी आपल्या न्याय हक्कासाठी मुंबईत पायी आले होते. उन्हाचे चटके सहन करत, काट्याकुट्यातून मार्ग काढत रक्ताळलेले पाय मुंबईत आले खरे, पण या सरकारला अद्याप पाझर फुटलेले नाही. नेहमीप्रमाणे आश्वासनांची खैरात करत तुम्हाला रिकाम्या हातीच माघारी पाठवले.

आज पुन्हा त्याच मागण्या घेऊन, तुमचे थकलेले देह नाशिकहून मुंबईकडे निघाले आहे. घरं ओस पडत आहेत, शेत पेरणीसाठी आपल्या मालकाची वाट बघतायत, बैल जोड गोठ्यात दिवस काढतेय… आपल्या बापाने जीवाचं बरं-वाईट करून घेऊ नये या धास्तीत शेतकऱ्यांची मुलं एक-एक दिवस लोटतायत. मात्र माझा शेतकरी सहजासहजी हार मानणाऱ्यातला नाही. जमवलेली तुटपूंजी रक्कम घेऊन, शिळी भाकर गाठोड्यात बांधून या शेठ लोकांपर्यत त्याचा खोल गेलेला आवाज पोहोचावा म्हणून मुंबईत येतोय. जगाच्या पोशिंद्याला नाईलाजाने सत्तेत मशगूल असलेल्या लोकांची हाजीहाजी करावी लागतेय. ही गोष्ट जीवाला लागतेय. माझ्या शेतकऱ्यांचा हा अपमान आहे. मराठवाड्यातही आज भीषण परिस्थिती आहे. भेगाळलेल्या, भकास जमिनी पाहिल्या की छातीत धस्स होतं. शेतकऱ्याच्या पोटी जन्म नकोच, असे वाईट विचार मनाला शिवतायत. मराठवाड्याचा सुपूत्र, तुमचा लेक, तुमचा भाऊ, तुमचा मित्र या नात्याने मी तुमच्या आंदोलनास पाठिंबा पाठवत आहे. तुमच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी मी स्वत: लढा देईन. या सरकारला झुकवल्याशिवाय आपण आता शांत बसायचं नाही. आता नडायचं…

तुमचा,
धनंजय मुंडे

अशा प्रकारे धनंजय मुंडे यांनी भावनिक पत्र लिहित शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. शेतकरी लाँग मार्च करत असताना त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते याचाही उल्लेख त्यांनी आपल्या पत्रात केला आहे. शिवाय त्यांच्या या लढ्यासाठी, मागण्यांसाठी ते स्वत: लढा देणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.

लोकसभा निवडणूक : शरद पवारांकडून स्व:ताची उमेदवारी घोषित