२ हजार रुपयांची लाच स्विकारताना अभय केंद्रातील कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जळ्यात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – न्यायालयात अहवाल सादर करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महिला व बाल विकास अंतर्गत अभय केंद्रातील कर्मचाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (गुरुवारी) करण्यात आली.
अमोल सर्जेराव पाटील असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी २२ वर्षीय महिलेने नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार महिलेचा देगलूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात कौटूंबिक हिंसाचाराचा दावा दाखल आहे. या प्रकरणात न्यायालयात अहवाल सादर करण्यासाठी पाटील याने महिलेकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली. महिलेने याची तक्रार नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पथकाने ३१ जानेवारी रोजी याची पडताळणी केली. त्यावेळी पाटील याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने आज सापळा रचून पाटील याला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले, पोलीस नाईक शेख चांद, गणेश तालकोकूलवार, आशा गायकवाड, शिवाजी पवार, अनिल कदम यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.